काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची उपस्थिती;लोकसभेच्या युद्धासाठी तुमचे आशीर्वाद द्या; प्रणिती शिंदे यांनी केले आवाहन.
सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, लिंगायत समाजाचे नेते धर्मराज काडादी, विश्वनाथ चाकोते, शिवसेना नेते उत्तम खंदारे, भगिरथ भालके, आदी मान्यवर जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. यावेळी सोलापुरच्या लेकीला पाठिंबा देण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित असल्याचे पहायला मिळाले.
प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली. तसेच यानंतर भव्य अशी रॅली काढण्यात आली. ही रॅली काँग्रेस भवन मार्गे सिव्हील चौक, बेडर पूल ते सात रस्ता मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचली. रॅलीच्या सुरूवातीला झालेल्या सभेला संबोधित करताना प्रणिती शिंदे यांनी आपल्या आक्रमक शैलीत भाजप सरकारचा खरपूस समाचार घेतला.
भाजपने मागच्या दहा वर्षात विश्वासाने सोलापुरकरांचा वापर करून मतदान घेतले आणि सत्तेची मजा घेतली. आज लोकांना गरज असताना त्यांनी पाठ फिरवली. आज अजूनही त्यांच्या उमेदवारासोबत मागचे दोन खासदार फिरत नाहीत. का तुम्हाला त्यांची लाज वाटते का? असा खडा सवाल यावेळी प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. माझे वडील माझ्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. ही लढाई आपल्या सगळ्यांची लढाई आहे, असे शिंदे म्हणाल्या. मी या लोकसभेच्या लढाईला जात असून तुम्ही सर्वांनी विजयी आर्शीवाद द्यावा, असे आवाहनही प्रणिती शिंदेंनी यावेळी केले.
महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, माकप, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी सगळे आमच्यासोबत आहेत. ही लढाई आपल्या सगळ्यांची असून आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू भाजप आहे. त्यांची जागा दाखवून द्यायला पाहिजे. सोलापूरचे नुकसान झाले आहे. त्याचा बदला घेण्याची वेळ आहे. पुन्हा एकदा सोलापूरला विकासाच्या आणि प्रगतीच्या वाटेवर आणण्याची गरज आहे. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या, मी सोलापूरची लेक, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी काम करत राहील, असे आश्वासन यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले.
या सभेला संबोधित करताना माकपचे नेते नरसय्या आडम यांनी भाजपवर जोरदार निशाना साधला. रे नगर वसाहतीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न भाजप कडून केला जात आहे. मात्र या योजनेची सुरवातच २०१३ मध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून झाल्याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली. भाजप सरकारने निधी दिला म्हणजे काय त्यांनी त्यांच्या खिसातून निधी दिला का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला.
सोलापुरच्या लेकीसाठी कार्यकर्त्यांची लाट
प्रणिती शिंदे यांच्या अर्ज भरण्यानिमित्ताने आयोजित रॅली सोलापूर लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच गावोगावच्या हजारो नागरिकांनी या रॅलीत सहभाग नोंदवल्याचे चित्र पहायला मिळाले. यावेळी युवक, युवती आणि महिला कार्यकर्त्याच्या लाक्षणिय सहभाग दिसून आला.
प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने, राष्ट्रवादीचे नेते महेश कोठे, सुधीर खरटमल, महेश गादेकर, शिवसेना ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बरडे, उपनेते शरद कोळी, अस्मिता गायकवाड, अजय दासरी, गणेश वानकर, यु एन बेरिया, अमर पाटील, उत्तमप्रकाश खंदारे, भारत जाधव, प्रमोद गायकवाड, तौफिक शेख, एम एच शेख, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम. पाटील, शहर अध्यक्ष निखिल किरनाळे, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अबू तालिब डोंगरे, ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, सुरेश हसापूरे आदी मान्यवर नेतेमंडळी आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.