कोळी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यासाठी जातीचा दाखला त्वरित मिळावा म्हणून वंचित आघाडीचा पंढरपुरात हलगीनाद मोर्चाचे आयोजन
पंढरपूर (प्रतिनिधी):पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कोळी समाजाला जातीचा दाखला मिळत नाही.
यामुळे कोळी समाज सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक प्रवाह पासून बाजूला आहे.
कोळी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जमातीचा दाखला गरजेचा आहे. मात्र कोळी समाजातील बांधवांना जातीचा दाखला मिळवण्यासाठी त्यांना 1950 पूर्वीचा दाखला मागितला जात आहे.
कोळी समाजाचा अनुसूचित जमाती मध्ये समावेश आहे.
गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ लोटला तरी महाराष्ट्र राज्य शासनामध्ये सत्तेत असणारे विविध पक्षाने कोळी समाजाला अनुसूचित जमाती मधील समाविष्ट करून न घेता फक्त आश्वासनाद्वारे झुलवत ठेवण्याचे काम आज पर्यंत सर्वपक्षीय नेते मंडळींनी केलेले आहे.
या झोपी गेलेल्या शासनाला जागी करण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयावर शुक्रवार दिनांक १६ फेब्रुवारी २०२४ रोजी वंचित आघाडी यांच्या वतीने याचबरोबर कोळी समाजातील विविध संघटनांच्या वतीने हलगी नाद मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी दिली.
ते पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पांडुरंग खांडेकर, पंढरपूर शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे, सुरेश शिंदे, सोमनाथ अभंगराव, तालुकाध्यक्ष संतोष कांबळे, सुनील देधाडे, बिरप्पा मोटे, प्रशांत कोलेवार, अण्णा वाळके आदी मान्यवर उपस्थित होते.
भारतीय संविधानाने कोळी समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेले असून देखील त्यांना शासकीय सवलती शैक्षणिक,राजकीय आणि नोकरीमध्ये ज्या सवलती आहेत त्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचे काम आज पर्यंत करण्यात आलेले असल्याचा आरोप यावेळी गायकवाड यांनी केला.
संपूर्ण भारत देशामध्ये कोळी समाज हा मोठ्या संख्येने असून हा अधिक मागास असलेला हा समाज या कोळी समाजातील काही मोजक्या जाती या सवलतीचा फायदा घेत आहेत. कोळी ही प्रमुख जात असून महादेव कोळी, मल्हार कोळी, कोळी ढोर या पोट जाती असल्याची माहिती कोळी समाज बांधवांनी दिली.
कोळी समाजाला शासनाने त्वरित अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला त्वरित मिळावा. यासाठी बहुजन वंचित आघाडी यांच्या वतीने येत्या १६ तारखेला पंढरपूर शहरांमधून हजारोंच्या संख्येने कोळी बांधव हलगीनाद मोर्चाच्या माध्यमातून शासनाला जागे करणार आहे. अशी वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.