मंदिर समिती प्रशासनाकडे समाजसेवक संजयबाबा ननवरे यांची आग्रही मागणी
पंढरपूर/ प्रतिनिधी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीने कंत्राटी पध्दतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगार पुरवठा करण्यासाठी काढलेली निविदा प्रक्रिया रद्द करावी.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीने कत्राटी पध्दतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कामगार पुरवठा करण्यासाठी ठेकेदार नियुक्त करण्याच्या हेतुने जवळपास साडेचार कोटी रुपये खर्चाची निविदा काढली आहे. वास्तविक पाहता सध्या मंदीरे समितीकडे जवळपास २०० हंगामी कामगार हे केवळ दरदिवशी ३०० रुपये इतक्या रोजंदारीवर काम करीत असून अतिशय प्रामाणिकपणे ते आपली सेवा बजावात आहेत. या रोजगारात वाढ करण्याची देखील त्यांची सध्यातरी कुठली मागणी नाही. या हंगामी कामगारांच्या वेतनावर वर्षाकाठी अंदाजीत २ कोटी रुपये खर्च होत असताना मंदीर समितीने साडेचार कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवल्याने मंदिर समितीवर मोठा आर्थिक भार पडणार असल्याने काढलेली निविदा अनावश्यक आहे.
सद्या कार्यरत असलेले हंगामी कामगार हे पंढरपूर शहर व तालुक्यातीलच आहेत. मंदीरात बाहेरील एजन्सीकडून बाहेरील कामगार नियुक्त केले जाऊ शकतात. यामुळे स्थानिकांवर बेरोजगार होण्याची वेळ येणार आहे.
टेंडर पध्दतीने कामगार पुरवठा करणाऱ्या एजन्सीकडून कामगारांची होणारी पिळवणूक, शोषण यामुळे राज्यभरातून कंत्राटी भरतीस विरोध होत असताना मंदीर समितीने घेतलेला निर्णय वादग्रस्त व अन्यायकारी आहे. तरी तो तातडीने रद्द करावा अन्यथा उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा संजयबाबा ननवरे यांनी निवेदनाद्वारे मंदिर समिती प्रशासनाला दिला आहे.