मोहोळ तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान प्रणिती शिंदे यांनी साधला गोटेवाडी ग्रामस्थांशी संवाद
पंढरपूर/प्रतिनिधी
ही लढाई फक्त माझी नसून आपल्या सगळ्यांची आहे. आपल्या सगळ्यांचा भाजप शत्रू आहे. गेल्या 10 वर्षात भाजपने फक्त विश्वासघातच केला आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. मोहोळ तालुक्यातील गावभेट दौऱ्यादरम्यान बुधवारी प्रणिती शिंदे गोटेवाडी येथे बोलत होत्या.
यावेळी पुढे बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी राजकारणात सत्तेसाठी आले नाही, किंवा टक्केवारीसाठी आले नाही. मला ईडीची भीती वाटत नाही, कारण माझ्याकडे कारखाना नाही किंवा सोसायटी नाही. दरम्यान, ही माझी एकटीची लढाई नाही तर आपल्या सगळ्यांची लढाई आहे. सामान्य लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 15 लाखांची वाट पाहत आहेत. भाजपने लोकांकडून मतदान घेऊन त्यांचा वापर करून घेतला. त्यांनी काहीही करून दाखवले नाही, अशी टीका यावेळी शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, या भाजपच्या दोन्ही खासदारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात कोणतेही काम केले नाही. सुरुवातीला एका खासदाराने काम केले नाही, म्हणून दुसरा उमेदवार दिला. त्यांनीही काम केले नाही म्हणून आता तिसरा उपरा उमेदवार आणला असल्याचे टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले कोणतेही आश्वासन पाळले नाही. मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. तीनशे रुपयांचा सिलेंडर बाराशे रुपयांना झाला आहे. तर शेतकऱ्यांच्या खतावर देखील जीएसटी लावली आहे. एका बाजूला सहा हजार रुपये देतात आणि दुसऱ्या बाजूने जीएसटी लावून पैसे काढून घेतात, अशी टीका शिंदे यांनी केली.
यावेळी मोहोळ तालुका काँग्रेस अध्यक्ष सुलेमान तांबोळी, मंगळवेढा काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, राजेश पवार, आप्पा हांडे, किशोर पवार, सीमा पाटील, विक्रम देशमुख, बालाजी लोहकरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.