अनिल सावंत यांच्या वतीने पंढरपुरात नोकरी महोत्सवाचे आयोजन
पंढरपूर /प्रतिनिधी
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध व्हावी. या हेतूने भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून पंढरपूर येथील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या नोकरी महोत्सवात ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने हजारोच्या संख्येने तरुण तरुणींनी सहभाग नोंदवून लाभ घेतला.
या नोकरी महोत्सवाचे उद्घाटन पंढरपूर येथील विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी व्यासपीठावर मर्चंट बँकेचे माजी चेअरमन नागेश भोसले, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष एम.पाटील, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष संदीप मांडवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अमर सूर्यवंशी, माजी नगरसेवक आदित्य फत्तेपुरकर, किरणराज घाडगे, संजय बंदपट्टे उपस्थित होते.
यावेळी बोलताना अनिल सावंत म्हणाले की गेली अनेक वर्षांपासून कारखान्याच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच पंढरपूर येथे सावंत कुटुंबीयांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून लाखो नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे. तसेच पुढील काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता सर्वसामान्यांसाठी काम करत राहणार असल्याचा विश्वास सावंत यांनी उपस्थित नागरिकांना दिला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भैरवनाथ शुगरचे व्हॉइस चेअरमन अनिल सावंत यांच्या वतीने गेली काही दिवसांपासून पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. याला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
याचाच एक भाग म्हणून रविवारी पंढरपूर येथे भव्य नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या नोकरी महोत्सवाच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेऊन बेरोजगार असलेल्या हजारो तरुण-तरुणींना नोकरीची संधी मिळाली आहे.
नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अनेक तरुण-तरुणींनी अनिल सावंत यांचे आभार मानले.