पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची उमेदवारीबाबत झाली सकारात्मक चर्चा
पंढरपूर/प्रतिनिधी
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन व जिल्हा परिषद सदस्य वसंतनाना देशमुख यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
मंगळवारी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. भेटी दरम्यान पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारी बाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले उपस्थित होते.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्याची तयारी वसंतनाना देशमुख यांनी त्यांच्या वाढदिवसापासून सुरू केली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांनी विचारविनिमय बैठकीच्या माध्यमातून कासेगाव येथे मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि भूमिका जाणून घेतली.
यावेळी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तूतारी हाती घेऊन निवडणूक लढवावी अशी मागणी अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांनी केली.
यावेळी त्यांनी लवकरच आपण शरद पवार यांची भेट घेऊन तशी मागणी करणार असल्याचे सांगितले होते. याबाबत मंगळवारी त्यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली.
यावेळी त्यांना नेते मंडळींकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याने वसंतनाना देशमुख हे निवडणुकीत तुतारी फुंकणार हे जवळपास निश्चित झाले आहे.