कासेगाव येथे विचारविनिमय बैठक संपन्न; कार्यकर्त्यांची महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवण्याची आग्रही मागणी
पंढरपूर /प्रतिनिधी
आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी करणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते वसंतनाना देशमुख यांनी दिली. या त्यांच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकीत परिचारक गटाला मोठा फटका बसणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हॉइस चेअरमन तथा कासेगाव जिल्हा परिषद गटाचे विद्यमान सदस्य वसंतनाना देशमुख यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी करण्यासाठी कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीचे आयोजन करून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली.
यावेळी वसंतनाना देशमुख यांच्या कार्यकर्त्यांनी आणि दिग्गज नेते मंडळींनी निवडणूक लढवावी अशी आग्रही भूमिका मांडली.
यावेळी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील दिग्गज नेतेमंडळींनी त्यांना पाठिंबा दिला.
या विचार विनिमय बैठकीच्या निमित्ताने देशमुख यांनी विधानसभेची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
यावेळी व्यासपीठावर माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, दीपक वाडदेकर, नगरसेवक सुरेश नेहतराव, महंमद वस्ताद यांच्यासह पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील अनेक नेते मंडळी उपस्थित होते.