पंढरपूर/प्रतिनिधी
भाजपकडून सुशीलकुमार शिंदे यांच्या विरोधात खोटे नाटे आरोप केले जात आहेत. मात्र विकासाच्या मुद्द्यावर न बोलता आमच्यावर कितीही खोटे-नाटे आरोप केले तरी राम सातपुतेजी तुम्हाला फार काळ जनतेचे प्रश्न टाळता येणार नाहीत. सोलापूरची लेक म्हणून मी तुम्हाला सोलापूरच्या मूलभूत प्रश्नापासून पळ काढू देणार नाही, असे आव्हानच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी सातपुते यांना दिले आहे.
शिंदे म्हणाल्या, खोट बोलायचं आणि ते रेटून बोलायचं ही भाजपची जुनीच परंपराच आहे. भाजपने गेल्या 10 वर्षात सोलापूरच्या प्रश्नावर काहीच काम केलं नाही. त्यामुळेच दरवेळी सोलापूरची निवडणूक आली की भाजपकडून प्रचारादरम्यान फक्त शिंदे साहेबांवर खोटे नाटे आरोप केले जातात आणि सोलापूरकरांच्या मूळ मूलभूत प्रश्नांपासून पळ काढला जातो. त्यांची आणि त्यांच्या उमेदवारांची नेहमीची पद्धत असल्याचा घणाघातही त्यांनी यावेळी राम सातपुते यांच्यावर केला. मात्र सोलापूरच्या विकासासाठी मी भाजपला धारेवर धरणार, विकासाच्या मुद्द्यापासून त्यांना पळ काढू देणार नसल्याचे आव्हान प्रणिती शिंदे यांनी दिले. त्या सोलापूर शहरातील अवंतीनगर येथे आयोजित शिक्षक सन्मान कृती समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.
जुनी पेन्शन योजनेला पाठिंबा
यांनी सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीला आपला पाठिंबा दिला. राज्यात आणि देशात आघाडीचे सरकार आल्यावर जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी प्रणिती शिंदे यांनी दिले. यावेळी दक्षिण सोलापूर विधानसभेचे माजी आमदार दिलीप माने, सोलापूर काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उद्योजक श्रीकांत पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या की, केलेल्या कामाचा गवगवा करणे हे शिंदे कुटुंबियांच्या रक्तात नाही. आम्ही आणि काँग्रेसचे कार्यकर्ते पूर्णवेळ सोलापूरकरांच्या सेवेत कायम असतो. सातपुतेंकडून मागील १० वर्षात सोलापूरमध्ये कोणकोणती विकास कामे झाली यावर चर्चा होताना दिसून येत नाही. त्यावरून शिंदे यांनी ‘मी माझ्या १५ वर्षांच्या आमदारकीच्या कालखंडात काय काय विकास कामे केली आहेत, ती जाहीरपणे सर्वासमोर सांगते. भाजप किंवा त्यांचे उमेदवार राम सातपुते यांच्या सारखे मुख्य मुद्द्यावरून पळ काढत नसल्याची’ बोचरी टीकाही यावेळी केली.
या निमिताने मी सर्व सोलापूरकरांना हेही सांगू इच्छिते की भाजपचे शिंदे कुटुंबियावर निवडणुकी पुरते खोटे नाटे आरोप करायचं सत्र इथेच थांबणार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे. पुढचे ३०-३५ दिवस आता माझ्यावर आणि माझ्या परिवारावर असे अनेक खोटे नाटे आरोप भाजपतर्फे करण्यात येतील. खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचेही प्रयत्न केले जातील अशी मला शंका आहे. त्यासाठी भाजपची संपूर्ण टीम कामाला लागली आहे. मात्र भाजपच्या या षडयंत्राला सर्वसामान्य सोलापूरकर जनता आता बळी पडणार नाही, याची मला खात्री असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
*दहा वर्षात रावण राज्य होते का?*
सध्या भाजपकडून’सोलापुरात आता रामराज्य येणार! असल्याचा प्रचार केला जात आहे. म्हणजे गेली दहा वर्षे सोलापुरात रावणाचं राज्य होतं असं भाजपवाल्यांना वाटत आहे का? भाजपवल्यांकडूनच तसा प्रचार केला जात असल्याचा टोलाही प्रणिती शिंदे यांनी भाजप लगावला आहे. तसेच गेली १० वर्ष भाजपकडे देशाची, राज्याची , सोलापूरची सत्ता होती. मात्र, भाजपने सोलापूरच्या विकासासाठी काय कामे केली? हे त्यांना अजूनही सांगता येत नाही. त्यामुळे राम सातपुते यांनी आधी सोलापूरकरांच्या प्रश्नांना आधी उत्तरे द्यावीत, असे आवाहनही शिंदे यांनी यावेळी केले.दरम्यान, यावेळी आम्ही ही निवडणूक लोकांच्या प्रश्नावरच लढणार असून जिंकणार देखील असा विश्वास देखील प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला आहे.